भाजपचा ‘हा’ नेता शिवसेनेच्या वाटेवर ?  

0
664

औरंगाबाद , दि. ३१ (पीसीबी) – भाजपचे शहराध्यक्ष व माजी आमदार  किशनचंद तनवाणी  यांनी मातोश्रीवर  जाऊन  शुक्रवारी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेकडून २०१४  च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्ये तिकीट न मिळाल्यामुळे  ते भाजपकडून निवडणूक लढले होते.  

वाळुज येथे  केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी औरंगाबाद मधून किशनचंद तनवाणी यांनी मुलाखत दिली.  त्यानंतर तनवाणी  मातोश्रीवर गेले. त्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान, किशनचंद तनवाणी यांनी या चर्चांवर खुलासा केला आहे.  मी मुंबईला असल्याचे स्वतःचे स्टेटस टाकले. मला अनेकांचे फोन आले की तुम्ही मातोश्रीवर  गेला आहे का?  मी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश सभा घेतली.   इच्छुक म्हणून मुलाखतही दिली. मग मी मातोश्रीवर कसे जाणार.  मुंबईला माझ्या खाजगी कामासाठी आलो आहे. मुख्यमंत्री जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत मी कुठे जाणार नाही.