भाऊ, दादा पैसे खाई… आमच्या शहराला पाणी नाही…; राष्ट्रवादीचे पालिकेसमोर आंदोलन

0
320

पिंपरी,दि.१५(पीसीबी) – सत्ताधारी भाजप शहरावसीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि प्रशासनाच्या विरोधात आज महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

भाऊ, दादा पैसे खाई… शहराला आमच्या पाणी नाही…, ओ माई पाणी नाही…,सत्ताधारी भ्रष्टाचारी भाजपचे करायचे काय खाली डोके वर पाय…, शहरावसीयांना दररोज पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, मयूर कलाटे, राजू बनसोडे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका अपर्णा डोके, संगिता ताम्हाणे, शमीम पठाण, फजल शेख, वर्षा जगताप आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

दरम्यान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणात आहे. पाण्याची चिंता संपली. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल. दररोज पाणी मिळेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम ठेवला. त्यानंतर प्रशासनाने नोव्हेंबरअखेरपासून टप्या-टप्प्याने दररोज पाणीपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली. परंतु, ती डेडलाईनही प्रशासन पाळू शकले नाही. याला भाजप जबाबदार आहे. सत्ताधारी भाजप शहरावसीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले.