भांडणाच्या कारणावरून सासरच्या लोकांकडून जावयासह त्याच्या आई, वडील, भावाला बेदम मारहाण

0
363

वाकड, दि. ६ (पीसीबी) – पती-पत्नीचा कौटुंबिक वाद सुरु असल्याने त्यांचा न्यायालयात घटस्फोटाचा दावा सुरु आहे. दरम्यान पती-पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावरून पत्नीच्या माहेरच्या लोकांनी पतीला, त्याच्या आई, वडील आणि भावाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 5) सकाळी वाकड येथे घडली.

राजेंद्र लक्ष्मण दगडे (वय 34, रा. कस्पटे वस्ती, विष्णुदेवनगर, वाकड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांची पत्नी, सासू, सासरे, मेहुणा, तीन महिला आणि तीन चार अनोळखी महिला व पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र आणि आरोपी महिला हे पती-पत्नी आहेत. त्यांच्या कौटुंबिक वाद असल्याने त्यांचा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा चालू आहे. आरोपी पत्नीचा संपूर्ण खर्च फिर्यादी करत आहेत. शनिवारी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले.

त्या कारणावरून सर्व आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी, त्यांची आई, वडील आणि भावाला हाताने, बुक्क्यांनी, लाथांनी व चपलांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.