भरलेल्या सिलेंडर मधून गॅस चोरी केल्याप्रकरणी गॅस एजन्सी चालकासह दोघांना अटक

0
440

थेरगाव, दि. 9 (पीसीबी) : धोकादायकरित्या तसेच फसवणूक करण्याच्या उद्देशाने भरलेल्या गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी केल्याप्रकरणी गॅस एजन्सी चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी (दि. 7) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास वाकड रोड, वाकड येथील सिद्धनाथ गॅस सर्विस येथे केली.

दादा विठोबा मेटकरी (वय 34, रा. थेरगाव), महेंद्र खियाराम ईसरवाल (वय 50, रा. डांगे चौक, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दादा मिटकरी  याचे वाकड रोडवर सिद्धनाथ गॅस सर्व्हिस हे दुकान आहे. त्याने दुकानामध्ये इंण्डेन गॅस कंपनीचे गॅस सिलेंडर अतिप्रमाणात साठा करून ठेवले. तसेच धोकादायकरित्या एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस चोरी केली. यासाठी त्याने कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली नाही. आरोपींनी घरगुती भरलेल्या सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडर टाकीमध्ये गॅस काढून घेऊन गॅसची चोरी केली. तसेच ग्राहकांची फसवणूक केली. पोलिसांनी कारवाई करून रोख रक्कम, अॅपे रिक्षा, गॅस व इतर साहित्य असा एकूण एक लाख 27 हजार 287 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके तपास करीत आहेत.