भरकटलेल्या समाजाला वाट दाखवण्याचे काम वारकरी सांप्रदाय करतो – खासदार बारणे

0
42

वडगाव मावळ, दि. १०(पीसीबी) – वारकरी सांप्रदायाने संतांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. सांप्रदायाचे समाजासाठी मोठे योगदान आहे. भरकटलेल्या समाजाला वाट दाखवण्याचे काम वारकरी सांप्रदाय करीत आहे, असे गौरवोद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले.

कान्हे येथील साईबाबा सेवाधाममध्ये झालेले मावळ तालुका वारकरी सप्रदाय मंडळाच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी वारकरी सांप्रदाय मावळरत्न पुरस्कारांचे वितरण खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी व्यासपीठावर हभप स्वामी निरजानंद सरस्वती (परमहंस), हभप गुरुवर्य सुदाम महाराज भोसले (घोराडेश्वर), राजस्थान वारकरी सांप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष हभप श्रीमंत रमेशसिंहजी व्यास, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, मावळ तालुका भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव कोंडे तसेच शरद हुलावळे, चंद्रशेखर भोसले चऱ्होलीकर, देवा गायकवाड, मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष हभप नंदकुमार भसे, कार्याध्यक्ष हभप संतोष कुंभार, उपाध्यक्ष हभप दिलीप वावरे, सचिव हभप रामदास पडवळ, खजिनदार हभप नितीन आडिवळे आदी उपस्थित होते.

बारणे म्हणाले की, संतांच्या शिकवणीचा वारसा जपत पुढील पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम वारकरी सांप्रदाय करीत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, हे आपण आपले भाग्य समजतो.

यावेळी वारकरी सांप्रदाय मावळरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. निष्ठावंत वारकरी म्हणून ह भ प वाघोजी राघू पाठारे (डोंगरगाव), कीर्तनकार म्हणून हभप भागुजी महाराज करंडे (पारिठेवाडी), मृदुंगाचार्य म्हणून हभप गणपत विष्णू सुतार (मिस्त्री) (येळसे), तर सामाजिक कार्यासाठी ह भ प सदाशिव अण्णा गाडे (सुदुंबरे) व हभप राजाराम खंडू गायकवाड (कांब्रे) यांचा खासदार बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.