भय इथले संपत नाही. चिंचवड आणि तळेगावात दोन घरफोड्या

0
264

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – वाल्हेकरवाडी परिसरातून भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 87 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तर तळेगाव दाभाडे येथील एका अपार्टमेंट मधील दोन घरे फोडली असून एक कार चोरून नेली आहे. याबाबत शनिवारी (दि. 26) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

संतोष शांतप्पा नागलापूर (वय 38, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागलापूर यांच्या घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी 87 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली. दरम्यान फिर्यादी यांच्या घरात लग्न सोहळा असल्याने ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. विवाह सोहळा झाल्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

रिटा नंदकिशोर जुगसेनिया (वय 30, रा. स्वराज्यनगरी, तळेगाव, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुगसेनिया यांच्या अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी शुक्रवार (दि. 25) रात्री पावणे दहा ते शनिवार (दि. 26) सकाळी साडेआठ या कालावधीत दोन घरे फोडली. त्यातील फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून एक लाखाचे दागिने आणि तीन हजारांची रोख रक्कम चोरून नेली.

त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहणारे संजय ब्रह्मा यांच्या घरात देखील चोरी केली. मात्र, त्यांच्या घरातून कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याबाबत माहिती मिळाली नाही. फिर्यादी यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली अरुण कुमार दास यांची एक लाख तीन हजारांची अल्टो कार (एम एच 14 / ए इ 4483) देखील चोरट्यांनी चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.