भगवा रंग भारतीयांसाठी अभिमानाचा – शशी थरूर

0
683

चेन्नई, दि, ७ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवरून राजकारण रंगत असतानाच भगवा रंग भारतीयांसाठी अभिमानाचा रंग असून त्याचे राजकारण करू नये असे मत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. चेन्नईतील एका कार्यक्रमात भारताच्या भगव्या जर्सीचे त्यांनी समर्थन केले आहे.

भारतीय संघाची जर्सी आतापर्यंत निळ्या रंगाची होती. पण आयसीसीच्या नियमांनुसार वर्ल्डकपमध्ये दोन संघांच्या जर्सीचा रंग एकच असू शकत नाही. तसंच वर्ल्डकप आयोजित करणाऱ्या देशाने त्यांच्या जर्सीचा रंग बदलला नाही तरी चालते. त्यामुळे भारतीय संघालाच आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागला. आता भारतीय संघाच्या जर्सीचा रंग भगवा आणि निळा आहे. या जर्सीच्या भगवेकरणावरून भरपूर वादळ उठते आहे. केंद्र सरकारला देशाचे भगवेकरण करायचे असल्याची टीका काँग्रेस नेते एम ए खान यांनी केली आहे. तर तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनीही खेळाचे भगवेकरण करू नका अशी टीका केली आहे. समाजवादी पक्षानेही भगव्या जर्सीचा विरोध केला आहे.

याबद्दल नुकतेच शशी थरूर यांना चेन्नई येथे विचारले असता ते म्हणाले, ‘भगव्या रंगाचे राजकारण करणे योग्य नाही. राष्ट्रध्वजातील तीन रंगांपैकी एक रंग भगवा रंग आहे. भगव्या रंगाचा भारतीयांना अभिमान वाटायला हवा. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मी भगव्या रंगाचा कुर्ता घालून निळ्या रंगाचा रुमाल घेतला आहे.’ असे त्यांनी सांगितले. यावर्षी भारतीय संघाच्या अनेक सामन्यांमध्ये शशी थरूर यांनी हजेरी लावली आहे.