तेलंगण, आंध्र ,केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा – अमित शहा

0
532

हैदराबाद, दि, ७ (पीसीबी) – तेलंगण, आंध्र प्रदेश आणि केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा. या राज्यांतील ५० टक्क्यांहून अधिक मतं भाजपच्या पारड्यात पडायला हवीत असा कानमंत्र भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना दिला आहे. दक्षिण भारतातील भाजप सदस्य जोडणी अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे भाजपच्या सदस्य जोडणी अभियानाची सुरुवात केली होती.

देशातील प्रत्येक गावात भाजपचा एक तरी सदस्य असायला हवा अशी आशा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशातील १७ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. या सर्वच राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करण्यात आली होती. पण दक्षिण भारतात मात्र कर्नाटक वगळता भाजपला कोणत्याच राज्यात विशेष यश मिळवता आलं नाही. तेलंगणमध्ये केवळ १९ टक्के मतं भाजपला मिळाली आहेत.

‘तेलंगणमध्ये यावेळी १९ टक्के मतं आपल्याला मिळाली आहेत .पण पुढच्या निवडणुकांमध्ये मात्र ५० टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडायला हवीत. तुम्हाला हे जमत नसेल तर मी प्रत्येक जिल्ह्यात, गावो-गावी जाऊन पक्षबांधणी करीन’ अशी ताकीदच अमित शहांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिली आहे. ‘ तेलंगण असो, आंध्र प्रदेश किंवा केरळ! ही राज्यं भाजपचा बालेकिल्ला व्हायला हवीत. या राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळायला हवं. तेव्हा वेगाने पक्षबांधणी करा.’ अशी सूचना अमित शहांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

तसंच भाजप पराभवामुळे खचणारा पक्ष नसल्याचंही त्यांनी सांगितलं ‘ अनेक पक्ष पराभवामुळे खचतात. त्या पक्षांचे शेकडो तुकडे होतात. पण भाजप काही असा पक्ष नाही. जाती आणि कुटुंबाच्या आधारावर भाजप उभा नाही, म्हणून भाजप कधीच खचून जाणार नाही. यावेळी पक्षबांधणीसोबत जलसंधारण आणि वृक्षारोपण करण्याची सूचनाही अमित शहांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिली.