“भगवान महावीर आणि संत महात्म्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणावी”: सचिन शहा

0
538

– जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहिर

पिंपरी, दि.२० (पीसीबी) : जैन समाज जीवदया, गोरक्षण आणि गोपालन या भगवान महावीर आणि संत महात्म्यांनी दिलेली शिकवण नेहमीच आपल्या आचरणात आणीत असतो. तसेच उद्योग व्यवसायाबरोबरच सामाजिक सेवेत देखिल कायम अग्रेसर राहण्याची भुमिका जैन सोशल ग्रुप निभावत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र रिजनचे अध्यक्ष सचिन शहा यांनी केले.

जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शहर विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय जैन, प्रथम महिला सपना जैन आणि नविन कार्यकारिणीचा शपथ ग्रहण समारंभ वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सचिन शहा बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे पीआरओ राजेंद्र धोका, पुर्वाध्यक्ष सुहास लुंकड,  इंस्टॉलेशन ऑफिसर लालचंद जैन आणि नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष संजय जैन आणि कार्यकारिणीला लालचंद जैन यांनी शपथ दिली. राजेंद्र धोका यांनी बॅच तर पुर्वाध्यक्ष सुहास लुंकड यांनी ध्वज देऊन सन्मानित केले.

यावेळी पीआरओ राजेंद्र धोका म्हणाले की, पिंपरी चिंचवड शाखा इतर सर्व शाखांपेक्षा जास्त कार्यरत असणारी शाखा आहे. येथून पुढील कालावधीत देखिल या शाखेचे काम इतर शाखांना आदर्श घेण्यासारखे होईल.

नवनियुक्त अध्यक्ष संजय जैन म्हणाले की, मागील एप्रिल महिण्यापासून भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गो – शाळांना चारा वाटप, कोरोना काळात वृध्दाश्रम, अनाथ आश्रम येथे किराणा किट वाटप असे सामाजिक कार्यक्रम केले आहेत. हि कार्यकारिणी दोन वर्षांसाठी आहे. पुढील काळातही शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक उपक्रम आणि गरीब मुलांना शैक्षणिक दत्तक घेणे असे नियोजन आहे.

सुत्रसंचालन प्रितम जैन, मोनिका गांधी, संगिता मंडलेचा यांनी केले आणि आभार सचिव सचिन मुथा यांनी मानले.