बोगस पत्रकारांचा सुळसुळाट; दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ठेकेदाराकडून उकळले ३० हजार रुपये

0
44

पोलिसांकडून होणाऱ्या त्रासापासून वाचविण्यासाठी व गुन्हा दाखल होऊ देणार नाही, अशी खोटी बतावणी करून दोन कथित पत्रकारांनी एका ठेकेदाराकडून २ लाखांची खंडणी मागत ३० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हडपसर व लोणी काळभोरसह परिसरात बोगस पत्रकारांच्या ब्लॅकमेलिंगमुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. तर हे बोगस पत्रकार मोकाट फिरत आहेत. यामधील एक कथित पत्रकार हा भारतातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेचा तालुकाध्यक्ष, तर दुसरा हा त्याच संघटनेचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठ दिवसांपूर्वी एका दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली होती. याप्रकरणी ठेकेदारावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्याला लोणी काळभोर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ठेकेदाराने चिमुकल्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली व चिमुकल्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावी पाठविण्याची व्यवस्था केली. यावेळी चिमुकल्याच्या आईवडिलांनी ठेकेदाराच्या विरोधात कोणतीही तक्रार दिली नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कथित दोन पत्रकारांनी ठेकेदाराला गाठले. एमआयटी कॉर्नर जवळील एका हॉटेलमध्ये बोलाविले. तुम्हाला या गुन्ह्यातून व पोलिसांच्या त्रासापासून वाचवितो. त्यासाठी तुम्हाला २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी खोटी बतावणी केली. त्यावेळी ठेकेदार म्हणाला, यामध्ये माझी काहीच चूक नाही. पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांनी याप्रकारे लिहून दिलेले आहे. मी कशाला पैसे देऊ, असे ठेकेदाराने यावेळी सांगितले.

त्यानंतर त्या कथित दोन पत्रकारांनी ठेकेदाराला धमकी दिली व तुला मिटवायचे आहे की नाही, ते सांग असे म्हणाले. त्यावर भीतीपोटी ठेकेदारांने बोगस पत्रकारांना ४० हजार रुपये देतो, असे सांगितले. ठेकेदाराने पाहुण्यांकडून उसने पैसे घेऊन त्या दोन भामट्यांना ३० हजार रुपये रोख स्वरुपात दिले. तर उर्वरित १० हजार रुपये दोन दिवसांनी देतो, असे सांगितले.

एवढ्यावरच न थांबता या कथित दोन पत्रकार ज्या हॉटेलमध्ये चहा-पाणी पिण्यासाठी बसले होते. त्या हॉटेलच्या खात्यावर १००० हजार रुपये ठेकेदाराकडून मागवून घेतले. म्हणजे चहा पिण्याचे पैसे सुद्धा हे भामटे देऊन शकत नाहीत.यावरून त्यांची कुवत काय हे नागरिकांनी समजून घेऊन, अशा बोगस पत्रकारांपासून सावध राहावे.

दरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोषी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याचे त्या कथित दोन पत्रकारांना माहिती देखील नाही. तरीही त्यांनी ठेकेदाराला उर्वरित १० हजार रुपयांच्या पैशाची मागणी केली. तेव्हा ठेकेदार म्हणाले, तुम्ही गुन्हा दाखल होऊ देणार नव्हते, मग गुन्हा कसा काय दाखल झाला. तेव्हा त्या दोन भामट्यांची बोलती बंद झाली. ठेकेदाराने दिलेल्या पैशाची मागणी केली असता, दोन्ही भामट्यांनी त्यांचा फोन कट करण्यास सुरुवात केली.

लोणी काळभोर परिसरात सध्या तोतया पत्रकार अवैध धंद्यांची बातमी करतो, अशी धमकी देऊन पैसे उकळल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. हे कथित पत्रकार तक्रारदारास भेटून मिटवून घ्या, असा मोलाचा सल्ला देतात. त्यामुळे या बोगस पत्रकारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हे महाशय तक्रार देतात आणि मिटविण्यासाठी हजारो रुपये उकळतात. या कथित पत्रकाराच्या विरोधात फिर्याद देण्यास कोणी पुढे येत नाही. त्यामुळे या कथित पत्रकारांना पोलीस कारवाईपासून संरक्षण मिळत असल्याने ब्लॅकमेलिंगचा धंदा तेजीत सुरु आहे. या बोगस पत्रकारांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

हडपसर, लोणी काळभोर परिसरात मोठा सुळसुळाट

हडपसर, लोणी काळभोर परिसरात बोगस पत्रकारांचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळत आहेत. अवैध बांधकाम व इतर दोन नंबर व्यावसायिक यांना धमकी देत पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. लोणी काळभोर व परिसरात एका तथाकथित मोठ्या पत्रकार संघटनेच्या मोहरक्याने लोणी काळभोर परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी काही दिवसांपूर्वी निवेदन दिले. त्यानंतर या प्रकरणात तडजोड करत पैसे उकळल्याची जोरदार चर्चा आहे.