बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छा निवृत्ती अपेक्षितच…

0
223

मुंबई,दि.२३(पीसीबी) : मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयात पाडकाम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘सामना’मध्ये ‘उखाड दिया’ अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली. त्याच बातमीवर बोट ठेवत कंगना रनौतने शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. मात्र खटल्यामध्ये प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच जे महाराष्ट्र, मुंबईविरोधात बोलतात त्यांचं पुढचं पाऊल राजकारणात आहे, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीबाबत केलं. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत संजय राऊत यांनी राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झालेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे, कंगना रनौत प्रकरण, ड्रग्ज प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली दीपिका पदूकोण यासह अनेक विषयांवर त्यांच्याच स्टाईलमध्ये भाष्य केलं.

गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती अपेक्षित होती
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी निवृत्तीच्या पाच महिने आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी व्हीआरएस घेतल्याची चर्चा आहे. याविषयी संजय राऊत म्हणाले की, “बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढवण्यासाठी काल स्वेच्छानिवृत्ती घेतली. पण गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्राला, पोलिसांना बदनाम करत होते. हे अपेक्षित होतं. याआधीही त्यांनी राजीनामा दिला होता. जे महाराष्ट्र, मुंबईविरोधात बोलतात त्यांचं पुढचं पाऊल राजकारणात आहे. त्यासाठी महाराष्ट्राला, मुंबईला पायपुसणीसारखं वापरणार असाल तर माझ्यासारखा माणूस जो बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालाय, जो उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करतो तो हे सहन करणार नाही.”

ड्रग्ज रॅकेट हे मुंबई, बॉलिवूड किंवा हॉलिवूडपुरतं मर्यादित नाही : राऊत
ड्रग्ज कनेक्शनमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही नाव समोर आलं आहे. यावर आता फक्त ट्रम्पचंच नाव यायचं बाकी आहे, इतर सगळी नावं झाली, असा उपहासात्मक टोला संजय राऊत यांना लगावला. हा तपास अत्यंत संयमाने आणि गुप्तपणे करायची गरज असते. ड्रग्ज रॅकेट हे मुंबई, बॉलिवूड किंवा हॉलिवूडपुरतं मर्यादित नाही. एनसीबीने देशातील प्रत्येक शहरात जाऊन उद्ध्वस्त केलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

जम्मू काश्मीरलाही फिल्मसिटी व्हायला हवी : संजय राऊत
उत्तर प्रदेशात फिल्मसिटी तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांनी केली आहे. मुंबईसारखी फिल्मसिटी देशभरात कुठेही बनणार असेल तर आम्हाला त्रास व्हायचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. पण मुंबईतील फिल्मी उद्योग आणि तिथे काम करणाऱ्यांना का बदनाम करता? असा सवालही त्यांनी विचारला. पाच लाख लोकांना यातून रोजगार मिळतो. हा उद्योग वाढला पाहिजे. एवढंच काय जम्मू काश्मीरला फिल्मसिटी व्हायला हवी. आता तिथलं 370 कलम हटवलं आहे तर तिथे फिल्मसिटी करायला हवी, असंही राऊत म्हणाले.