“बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का? ती एका देशातून दुसरीकडे जात नाही”

0
405

उस्मानाबाद,दि.१२(पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मंदी कळते का? असा प्रश्न करत खिल्ली उडवली आहे. मंदी एका देशातून दुसऱ्या देशात जात नसते, जगभर मंदी असते, त्यामुळे थोरातांनी मंदी काय असते, हे समजून घ्यावे असा खोचक सल्ला पाटील यांनी दिला.‘कर्जमाफी फसवी ठरत असून नवीन घोषणा केली जात नाही. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती दिली असून स्थगिती देणारे सरकार अशी यांची ख्याती होत चालली आहे असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

सध्याचे सरकार आधीच्या सरकारच्या सर्व योजना रद्द करत आहे. त्यामुळे या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागू देत, अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी तुळजाभवानी चरणी केली.

हे सरकार पडण्यासाठी नकारार्थी प्रार्थना मी कधीच करत नाही. जोपर्यंत सरकार आहे, तोपर्यंत त्यांच्यात समन्वय राहू दे. १०० युनिट वीज माफी, नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजार अशा अनेक मुद्द्यांवर तिजोरीत पैसा नसल्याचे कारण सांगत समन्वय दिसत नाही. त्यामुळे हे सरकार लोकोपयोगी पडू दे, अशी प्रार्थना केल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, दिल्लीत भाजपला 39 टक्के मते मिळाली. शिवसेनेला 0.1 टक्का, तर राष्ट्रवादीला 0.2 टक्के मतं मिळाली. ज्या काँग्रेसने 50 वर्ष दिल्लीवर राज्य केले त्यांना 4 टक्के मते मिळाली. भाजपला गेल्या वेळी 33 टक्के मतं मिळाली होती. तीन जागांवरुन 8 झाल्या. खूप जागा कमी मतांनी पडल्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पराभव आम्हाला मान्य असल्याचं सांगितलं.