बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर

0
507

पुणे, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. फेरपरीक्षेत यंदा केवळ २३.१७ टक्के, म्हणजेच ३० हजार ४३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फेरपरीक्षेचा निकाल जेमतेम अर्धा टक्काच वाढला आहे.

फेरपरीक्षेसाठी १ लाख ३१ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १ लाख ३१ हजार ३५५ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३० हजार ४३८ विद्यार्थीच उत्तीर्ण होऊ शकले. २०१८ आणि २०१७ मध्ये झालेल्या फेरपरीक्षेच्या निकालाची टक्केवारी अनुक्रमे २२.६५ टक्के आणि २४.९६ टक्के होती. फेरपरीक्षेत लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक ३३.८९ टक्के आणि मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी १९.१२ टक्के लागला. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता पुढील अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे.