बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी

0
252

पुणे, दि.१२ (पीसीबी) : हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेल्या बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७, रा. मार्बल आर्च सोसायटी, गणेश खिंड रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ४४७/२१) फिर्याद दिली आहे. चोरीचा हा प्रकार १६ ऑक्टोबर २०१९ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी मंदिराच्या जवळ २००६ मध्ये सप्तशृंगी या नावाने वैशिष्ट्रपूर्ण बंगला बांधला आहे. सुमारे ४० हजार चौरस फुट बांधकाम असलेला हा बंगला डोंगरच्या कडेला आहे. गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना सुमारे ४ वर्षांपूर्वी अटक केली. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयानेही त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन हा बंगला जप्त केला. तेव्हापासून हा बंगला बंद आहे.

कुलकर्णी कुटुंबावर ईडीने गुन्हा दाखल करुन तो जप्त केल्याने बंद होता. या बंगल्यामध्ये चोरी झाली असल्याच्या संशयाने फिर्यादी यांनी ईडीचे अधिकारी,
पोलीस व पंच यांच्या समक्ष पाहणी केली़ बंगल्याचे दरवाजाचे लॉक व सिल कोणीतरी चोरट्याने तोडून बंगल्यामधील ८ एल ई डी टीव्ही, कॉम्प्युटर, ३ सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदी, कॅमेरा, गिझर, पिठाची गिरणी असा एकूण ६ लाख ९५ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.

डोंगराच्या कडेला असल्याने या बंगल्यामध्ये डोंगरावरुन येण्यास चोरट्यांना वाव आहे़ तसेच गेली २ वर्षे हा बंगला बंद असल्याचे हेरुन ही चोरी झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.