बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही- उद्धव ठाकरे

0
803

मुंबई, दि. २० (पीसीबी) – संसदेत शुक्रवारी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा  मित्रपक्षाला खडे बोल सुनावले आहे. ‘जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. पण त्याने शेतकऱ्यांना मरणाच्या दारातून सोडवलेले नाही. जनतेच्या छाताडावर बंदुका रोखणारी ही अर्थव्यवस्था हुकूमशाहीच्या मार्गाने जाणार असेल तर त्यावर फुले उधळण्यापेक्षा आम्ही जनतेच्या न्यायासनासमोर उभे राहून पापक्षालन करू. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठीच डोंबाऱ्याचा खेळ करत राहणे ही लोकशाही नसून बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही, जनताच सर्वोच्च आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेनेने दिल्याने अविश्वास प्रस्तावात शिवसेनेची भूमिका काय असेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शुक्रवारी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार असून या ठरावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला फटकारले. लोकसभेत मोदी सरकारवर विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. त्यावर चर्चेचा गडगडाट होईल. आरोप-प्रत्यारोपांच्या विजा कडाडतील. पण भाजपाकडे बहुमत आहे आणि शेवटी मोदी युद्ध जिंकल्याच्या थाटात भाषण करतील, असे शिवसेनेने म्हटले आहे.

सध्या बहुमताचा अर्थ लोकभावनांची कदर असा नसून बहुमतवाल्यांची दडपशाही असा बनला आहे. लोकांना स्वप्ने दाखवायची, श्रद्धा आणि भावनांना हात घालून मते मागायची व लोकांनी एकदा भरभरून मतदान केले की हे सर्व चुनावी जुमले कधीही स्वच्छ न होणाऱ्या गंगेत बुडवून टाकायचे. जाहीर सभांना होणारी गर्दी म्हणजेच राज्य करणे असे कुणाला वाटत असेल तर तो भ्रम असून मुळात सध्याच्या सरकारने जे बहुमत किंवा विश्वास प्राप्त केला तोच संशयास्पद आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.