फडणवीस सरकारची सर्वपक्षीय कोंडी; धनगर, मुस्लिम आरक्षणाचाही आग्रह; पुण्यात जाळपोळ, सोलापुरात दगडफेक

0
897

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक  आक्रमक  झालेले असताना फडणवीस सरकारकडून मात्र संयमाचे आवाहन  करतानाच मुदत मागितली जात आहे. सरकारवर विश्वास नसलेल्या मराठा संघटना मात्र सरकारशी चर्चेलाही तयार नाहीत. त्यामुळे राज्यात आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी  पुणे, सोलापूर जिल्ह्यात हिंसक आंदोलने  झाली. औरंगाबाद जिल्ह्यात आणखी एक तरुणाने मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी आत्महत्या केल्यामुळे सरकारविरोधात  रोष  आणखी  वाढत चालला आहे

दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादीने या मुद्द्यावर सरकारला कोंडीत  पकडण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे पक्षाच्या आमदारांच्या  बैठका घेत व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. केवळ मराठा समाजालाच नव्हे तर धनगर, मुस्लिम, कोळी, लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या  मागण्या मंजूर करण्यासाठीही सरकारवर दबाव टाकला जात आहे. सत्ताधारी शिवसेनेनेही  आमदारांची  बैठक घेऊन मागासवर्ग आयोगाच्या  अहवालाची वाट न पाहता सर्वच मागास जातींना आरक्षण  द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. या सर्वपक्षीय विरोधामुळे  फडणवीस सरकार चांगलेच कोंडीच सापडले आहे .