प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार किरण नगरकर यांचे निधन

0
382

मुंबई, दि. ६ (पीसीबी) –  ‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘रावण अँड एडी’, ‘ककल्ड’, ‘द एक्स्ट्राज’ आदी क्लासिक कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार आणि अस्तित्ववादी साहित्याचे बिनीचे शिलेदार किरण नगरकर यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

किरण नगरकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज रात्री ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नगरकर यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून भाषेच्या सीमा ओलांडल्या होत्या. त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीतही लिखाण केले होते. मराठी साहित्य विश्वात त्यांची सात सक्कं त्रेचाळीस आणि ककल्ड ही कादंबरी प्रचंड गाजली. या दोन्ही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वातील क्लासिक कादंबरी म्हणून गणल्या जातात. त्यांना हिंदू लिटररी प्राइज, जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.