प्रभाग रचनेत भाजपाचे अनेक दिग्गज अडचणीत – राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी झालीच तर भाजपाला कठिण

0
459

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकिसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा आज प्रसिध्द करण्यात आला. ४६ प्रभागांच्या रचनेवर बारीक नजर टाकली तर राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांसाठी ही रचना अत्यंत फायद्याची असल्याचा बहुसंख्य राजकिय नेत्यांचा अंदाज आहे. सत्ताधारी भाजापाच्या दोन माजी महापौरांसह अनेक जेष्ठ नगरसेवक अडचणीत सापडले असून सुरक्षित प्रभागासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी महाआघाडी करून निवडणूक लढविल्यास प्रसंगी भाजपाचा सुपडा साफ होऊ शकतो, असाही निष्कर्ष काही नेत्यांनी काढला आहे. गेल्या निवडणुकित म्हणजे २०१७ मध्ये भाजपाने प्रभाग रचना केली आणि राष्ट्रवादीचा पाडाव केला होता, आता त्याचाच वचपा राष्ट्रवादीने काढला असून यावेळी पूर्ण प्रभागरचना मनासारखी करून घेतल्याने भाजपाचे खरे नाही, अशीही भावना राजकिय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीच्या दिग्गजांना फायदा –
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमदार अण्णा बनसोडे, संजोग वाघेरे, विलास लांडे, अजित गव्हाणे, योगेश बहल, आझमभाई पानसरे, मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, डब्बू आसवाणी, जगदिश शेट्टी, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, शाम लांडे यांना अत्यंत सोयिचे प्रभाग असल्याचे मानले जाते. त्याशिवाय भाजपा मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या रथीमहारथींसाठीही अनेक प्रभाग सुरक्षित करण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक मातब्बर नेत्यांचे प्रभाग सेफ केल्याचे दिसून येते. संत तुकारामगर, भोसरी, मासुळकर कॉलनी, संभाजीनगर, शाहूनगर, निगडी प्राधिकरण, दळवीनगर, भोईरनगर, पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, पिंपळेसौदागर, रावेत असे प्रभाग सोईचे केल्याचे दिसून येते. या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर पॅनेल प्रमुख असणार आहेत. म्हणजे त्यांच्यावर पॅनेलमधील तीन नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी असणार आहे.

राष्ट्रवादीच्या बरोबरच शिवसेनेच्या संभाव्य पॅनल प्रमुखांमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीवासाठी तसेच सचिन भोसले, राहुल कलाटे, सुलभा उबाळे, प्रमोद कुटे, धनंज आल्हाट, अमित गावडे यांच्या दृष्टीने त्यांचे प्रभाव क्षेत्र प्रभागात आल्याने त्यांच्या सोयिचा प्रभाग असल्याची चर्चा आहे. थेरगाव, ताथवडे, यमुनानगर, मोशी-बो-हाडेवाडी असे काही प्रभाग शिवसेनेसाठी सोईचे झाले आहेत. त्यामुळे शहरप्रमुख सचिन भोसले, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर युवा सेना प्रमुख विश्वजीत बारणे, रेखा दर्शिले, सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट सेफझोन मध्ये आहेत. राष्ट्रवादी आणि शिवेसनेने एकत्र महाआघाडी करून निवडणूक लढविल्यास तुलनेत भाजपाची परिस्थिती कठिण होई शकते, असाही अंदाज व्यक्त कऱण्यात आला आहे.
भाजपाचे प्रथम महापौर नितीन काळजे, दुसरे महपौर राहुल जाधव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्यासह अनेक दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग फोडल्याने किंवा गैरसोयिचा भाग जोडल्याने त्यांची खूप मोठी अडचण झाली आहे. शहरातील गावठाण क्षेत्र जिथे भाजपाला साथ देत होते त्या प्रभागाची शकले झाल्याने भाजपाचे किमान ३० नगरसेवकांची कोंडी झाल्याचे समजले जाते.
राज्यातील सत्तेत तिस-या क्रमांक असलेल्या काँग्रेसची मात्र फरफट झाली आहे. शहराध्यक्ष कैलास कदम यांचाही प्रभाग सेफझोनमध्ये राहिला नाही. एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनीपर्यंत त्यांचा प्रभाग असणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अनेकांच्या प्रभागांची तोडफोड झाली आहे. त्यामुळे अनेक मात्तबर अडचणीत आले आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे. काही ठिकाणी अनेक विद्यमान नगरसेवक आमने-सामने येतील अशी परिस्थिती आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी, सर्व प्रभाग रचना पाहिल्यावर १०१ टक्का राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले असून राष्ट्रवादी १०० प्लस जागा घेणार आणि महापौर राष्ट्रवादीचाच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. प्रभाग रचनेतच भाजपा गारद झाली असून आरक्षण सोडत आणि भाजपाच्या पाच वर्षांतील चुकांचा पाढा वाचायला सुरवात केल्यावर त्यांना पळता भुई थोडी होईल, असे वाघेरे यांनी पीसीबी टुडे प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.
काँग्रेसला कुठेही विचारात न घेतल्याने या पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कदम संतापले असून प्रभाग रचनेतील राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेसचा मोठा मतदार शहरात असल्याने त्याच निर्धाराने काँग्रेस रिंगणार उतरणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
दरम्यान, दुसऱ्या बाजुने भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी, ही प्रभाग रचना भाजपाच्या सोयिची असल्याचा दावा केला असून पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेचा खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभाग रचना झाली, पण आरक्षण सोडत झाल्यावर खरे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले. भाजपाने गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराची इतकी प्रकरणे केलीत की त्याच मुद्यावर भाजपाचा पराभव आरामात होईल, असे म्हटले.