शहर कॉंग्रेस सक्षमपणे निवडणूका लढणार – डॉ. कैलास कदम

0
339

पिंपरी,दि. १ (पीसीबी) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मंगळवारी प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या प्रारुप आराखड्याचा सखोल अभ्यास करुन योग्य ठिकाणी त्याबाबतचा आक्षेप व हरकत घेण्यात येईल. यामध्ये ज्या राजकीय व्यक्ती व पक्षांनी हस्तक्षेप केला असेल त्याबाबत देखील रितसर हरकत कॉंग्रेस पक्ष घेईल.

आगामी निवडणूकांच्या दृष्टीने सर्व जागांवर सक्षम उमेदवार देण्यासाठी पक्ष संघटना बांधण्याचे काम शहर कॉंग्रेस करीत आहे. निवडणूक विभाग त्यांचे काम करीत असून त्यांनी प्रारुप आराखडा जाहीर केला आहे. आगामी निवडणूका दोन, तीन अथवा चार सदस्यीय प्रभागाच्या अशा कशाही झाल्या तरी शहर कॉंग्रेस सक्षमपणे निवडणूका लढणार आहे अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

कॉंग्रेस पक्ष हा समाजातील सर्व घटकांना, गोर गरीबांना, कष्टकरी कामगारांना, झोपडपट्टीतील नागरिकांना न्याय मिळवून देणारा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. पिंपरी चिंचवड शहराची स्थापनाच मुळात कॉंग्रेस पक्षाने केली आहे. या शहराला कामगार नगरी म्हणून कॉंग्रेसनेच नावलौकिक मिळवून दिला आहे. आज स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून पिंपरी चिंचवड ओळखले जाते याची पायाभरणी कॉंग्रेसने केली आहे. शहरातील मतदार कॉंग्रेस बरोबर राहिल. निवडणूकांमध्ये मतदार हाच राजा असतो. कॉंग्रेसचा मतदारांवर विश्वास आहे. त्यामुळे निवडणूकांमध्ये सोयीस्कर प्रभाग रचनेने यश मिळेल यावर शहर कॉंग्रेसचा विश्वास नाही. सर्व सामान्य नागरीकांच्या समस्या सोडविणे, ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे कॉंग्रेसचे धोरण आहे त्या दृष्टीनेच शहर कॉंग्रेसची वाटचाल सुरु आहे अशीही प्रतिक्रिया कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी प्रसिध्दीस दिली आहे.