प्रभागातील गरजू नागरीकांना लॉकडाऊन काळात दोन वेळचे जेवण पुरविण्यात यावे – नाना काटे

0
306

पिंपरी,दि.२९(पीसीबी) – प्रभागातील गरजू नागरीकांना लॉकडाऊन काळात दोन वेळ जेवण पुरविण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

लॉकडाऊन काळात शहरातील गरजू नागरीकांना अपुरे व एकाचवेळी जेवण पुरविण्यात येत आहे. प्रत्येक वॉर्डात स्थानिक नगरसदस्यांशी समन्वय ठेऊन प्रभागातील गरजू नागरीकांना पुरेसे दोन वेळ जेवण पुरविण्यात यावे किंवा गरजू नागरीकांना शिधा पुरविण्यात यावा,अशी मागणी नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजविला आहे राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधी ३ मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. लॉकडॉऊनच्या काळात शहरातून गावी जाणा-या नागरीकांना प्रतिबंध करुन त्यांची राहण्याची, खाण्याची सोय मनपाने शहरातील वेगवेगळ्या निवारा केंद्रात केलेली आहे. त्यांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा दिला जात असून त्यांची मनपाने काळजी घेतली आहे. मनपाचे हे पाऊल स्वागतार्ह आहे परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामगार वर्ग जास्त आहे त्यापैकी ब-याच कामगारांचे हातावर पोट असून, दैंनदिन मोलमजुरी करुन आपली उपजिविका चालवितात. सध्याच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे या नागरीकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. लॉकडाऊनमुळे घर सोडू शकत नाहीत व घरी खायला काही नाही अशी अवस्था झालेली आहे. अशा नागरीकांनासुध्दा मनपाने शिधा अथवा जेवण पुरविणेबाबत आम्ही दिनांक १५/०४/२०२० च्या पत्रान्वये मागणी केली होते. त्या अनुषंगाने मनपाने अशा नागरीकांसाठी विविध संस्थांना शिधा पुरवून प्रत्येक प्रभागात गरजू नागरीकांना जेवण पुरविण्यात येत आहे.

दरम्यान सदर नागरीकांना मनपा मार्फत जेवण पुरवित असताना प्रत्येक प्रभागात किमान २००० नागरीकांना जेवणाची गरज असताना त्याठिकाणी फक्त ५०० ते ६०० नागरीकांसाठी जेवण पुरविले जात आहे. ते सुध्दा पुर्ण दिले जात नाही. कोणाला फक्त चपाती तर कोणाला फक्त भात असे तेही फक्त एकावेळेस पुरविले जाते. तसेच या नागरीकांना आधार कार्ड दाखविण्याची सक्ती केली जात आहे. एकीकडे आपण शहराबाहेरील नागरीकांना आपण निवारा केंद्रामध्ये ठेवून त्यांना दोन वेळ चहा, नाष्टा व दोन वेळ व्यवस्थित जेवण पुरवित आहोत. मात्र आपल्याच शहरातील नागरीकांना अपुरे जेवणे तेही एकवेळ देत आहोत, त्यामुळे नागरीकांची उपासमार होत आहे व नागरीकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामध्ये मनपाचे नियोजन व्यवस्थित नाही तसेच ज्या संस्थांना जेवण पुरविण्याची जबाबदारी दिली आहे ते मुद्दाम कमी जेवण व अपुरे पाठवित आहेत असे दिसून येते. तसेच मनपास नागरीकांना जेवण पुरविण्यात अडचणी येत असतील तर त्यांना शिधा पुरविण्यात यावा. म्हणजे त्यांना घरी दोन वेळ जेवण तयार येईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.