“प्रत्येक पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो. ते म्हणत असतील, ‘बघ तुझी कशी जिरवली!'”; पवारांचा टोला

0
699

पुणे, दि.२५ (पीसीबी) : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमधील नेते केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांवर अनेकदा हल्ला चढवताना पाहायला मिळतात. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पेट्रोल पंपावर असलेल्या बॅनर्सवरुन अजित पवार यांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे. यापूर्वीही जीएसटीच्या मुद्द्यावरुन अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केली होती.

‘आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून उत्तम प्रकारे काम करणारे अनेक पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदीसाहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की, पेट्रोल 100 च्या पुढे गेलं. पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली… घाल आता 100 रुपयाचे पेट्रोल!’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. येथील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

केंद्र सरकारने केंद्राचे टॅक्स लावायचे काम करावे पण राज्याला जो अधिकार दिला गेला आहे त्या अधिकारावर गदा आणता कामा नये. हे अधिकार कमी करता कामा नये. राज्य सरकारचा टॅक्स लावण्याचा अधिकार कमी करण्याबद्दल एखादी गोष्ट जीएसटी काऊन्सिलमध्ये आली तर तिथे मात्र स्पष्ट भूमिका मांडू, असं मत मांडत अजित पवार यांनी केंद्राच्या भूमिकेला तीव्र विरोध केला होता. राज्य सरकारला जीएसटी बाबतचा ‘वन नेशन्स वन टॅक्स’ हा कायदा करत असताना केंद्रसरकारने संसदेत जे – जे आश्वासन दिले ते पाळावेत असंही अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, राज्य सरकारांच्या विरोधानंतर पेट्रोल आणि डिझेलवर प्रचलित पद्धतीनेच कर आकारणी होईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्ष्ट केलं होतं.

पोलिस खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागते. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची काळजी वरिष्ठांनी घेतली पाहिजे. पुण्यात काही अधिकारी तणावात राहत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येतात. त्यामुळे असे प्रकार घडले नाही पाहिजेत. एकीनं काम करून विषय मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना आणि आपुलकीचा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.

पुणे आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ‘सीएमआयएस’ या वेबसाईट आणि अॅपचं उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पिंपरीचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुण्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पोलिसांनी तणावमुक्त राहून काम करण्याचा सल्ला दिला. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये कसलीही तडजोड करु नका, अशी सूचनाही अजित पवारांनी यावेळी दिली.