प्रतीक्षा संपली: अखेर गुजरातला भेटले नवीन मुख्यमंत्री; ‘या’ नेत्याकडे आता मुख्यमंत्री पदाचा कारभार

0
214

गुजरात, दि.१२ (पीसीबी) : शनिवारी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. नेमका रुपाणी यांनी पदाचा राजीनामा का दिला? याविषयी अनेक कारण दिली जात असताना आज गुजरात भाजपाच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र रजनीकांत पटेल यांची मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड करण्यात आली. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे. त्यासोबतच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. याआधी देखील ऑगस्ट २०१६ मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा नितीन पटेल त्यांची जागा घेतील, अशी चर्चा होती. मात्र तेव्हा देखील त्यांच्याऐवजी रुपाणी यांची निवड करण्यात आली होती.

विजय रुपाणी यांचे उत्तराधिकारी म्हणून उपमुख्यमंत्री नितीन पटेल, कृषिमंत्री आर. सी. फाल्दु, तसेच केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय यांची नावे चर्चेत होती.

भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यासोबतच अहमदाबाद महानगर पालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांच्यानंतर कोण येणार? या चर्चेमध्ये कुठेही भूपेंद्र पटेल यांचं नाव नव्हतं. त्यामुळे विजय रुपाणी यांनी ज्या प्रकारे अचानकपणे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तितक्याच अचानकपणे भूपेंद्र पटेल यांचं देखील नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊन जिंकलं देखील आहे! २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भूपेंद्र पटेल यांनी १ लाख १७ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. संपूर्ण गुजरातमध्ये २०१७च्या निवडणुकांमध्ये हा सर्वाधिक मतांचा फरक होता

‘मी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे, असे रुपाणी यांनी, शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. पक्षाचे राज्यप्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय यांच्यासह रुपाणी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामापत्र सुपूर्द केले. ‘‘पाच वर्षे राज्याची सेवा करण्याची मला संधी देण्यात आली. मी राज्याच्या विकासात योगदान दिले आहे. आता पक्षाच्या आदेशानुसार वाटचाल करेन,’’ असे रुपाणी यावेळी म्हणाले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री म्हणून राज्यातील नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.