पोलिसांवरील हल्ल्याचे सत्र संपेना: दापोडीत दोघा पोलिसांना पाच जणांकडून मारहाण

0
1027

दापोडी, दि. ११ (पीसीबी) – दापोडी पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना पाच जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी एकच्या सुमारास दापोडी येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घडली.

याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन भागजी म्हेत्रे (वय ३५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी रवींद्र दादाराव कोंडगे, वैजनाथ दादाराव कोंडगेसह पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ट्रकचालक अनिलकुमार छोटेलाल मित्रा आणि कारचालक वैजनाथ दादाराव कोंडगे हे दापोडी चौकीजवळून जात होते. यावेळी ट्रक कारला घासला आणि कारचे नुकसान झाले. कारचालकाने तीन भावासह एका मित्राला बोलवत ट्रकचालकाला बेदम मारहाण केली. यादरम्यान दापोडी पोलिस चौकीत महामार्गवर जॅम झाला असून भांडण सुरु असल्याचा कॉल आला. यावर पोलीस शिपाई सचिन म्हेत्रे आणि नरवडे हे दोघेही तेथे पोहचले. आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दोघांना तक्रार दाखल करण्याची विनंती केली. यानंतर ट्रकचालक पोलिसांसोबत दापोडी चौकी येथे आला,परंतु कारचालकाने तिथेच मित्रांसमवेत पुणे-मुंबई जुना महामार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.फिर्यादी पोलीस शिपाई सचिन भागाजी आणि पोलीस कर्मचारी नरवडे हे त्यांना हटवण्यासाठी गेले असता तिघांनी नरवडे यांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी रवींद्र दादाराव कोंडगे, वैजनाथ दादाराव कोंडगेसह पाच जणांना अटक केली.

दरम्यान, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पिंपरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नातेवाईक असल्याचे समजते. पोलीस उपनिरीक्षक एम.बी.गाढवे तपास करत आहेत.