पोलिसांना चकवा; सपाचा नेता आंदोलनाला जाण्यासाठी बनला नवरदेव तर कार्यकर्ते वऱ्हाडी

0
815

रामपूर, दि. १५ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील सपाचे नेते व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी खासदार आझम खान यांच्या समर्थनासाठी रामपूरमध्ये आंदोलनाची हाक दिली होती.  हे आंदोलन दडपण्यासाठी  योगी सरकारने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे पोलिसांना चकवा देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने चक्क नवरदेवाची वेशभूषा परिधान करून आंदोलन स्थळी हजेरी लावली.

संभलचे सपाचे जिल्हाध्यक्ष फिरोज खान यांनी लढवलेली शक्कल सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.  योगी सरकारने सपाच्या कार्यकर्त्यांना रामपूरमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे सपाच्या कार्यकर्त्यांना रामपूरमध्ये पोहोचणे मोठे अवघड झाले होते.

त्यामुळे फिरोज खान यांनी  नवरदेवाचा वेश करून पोलिसांना  चकवा देत  रामपूर गाठले. रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करून तपासणी सुरु असल्यामुळे फिरोज खान यांनी नवरदेवाचा वेश परिधान  केला. तोंडावर फुलांच्या मुंडावळ्या घातल्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हता. तर फिरोज खान यांचे कार्यकर्ते गाडीत वऱ्हाडाच्या वेषात बसले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिले. यानंतर फिरोज खान आपल्या कार्यकर्त्यांसह रामपूरमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी  दाखल झाले.