पॉवरफुल पवार कुटुंबाचे शिरूर मतदारसंघात केवळ राजकीय पर्यटन; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र

0
8223

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिलेली असतानाही शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे उमेदवारच नसल्याचे पाहायला मिळते. तरी देखील या मतदारसंघात महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक पॉवरफुल घराणे असलेल्या पवार कुटुंबातील सर्वांनी गेल्या एक-दोन महिन्यात हजेरी लावली आहे. आधी खासदार सुप्रिया सुळे, नंतर जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, त्यानंतर आमदार अजितदादा पवार यांनी शिरूर मतदारसंघात सभा घेतल्या. आता स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी (दि. १६) शिरूरमध्ये येणार आहेत. परंतु, संपूर्ण पवार कुटुंब शिरूर मतदारसंघात आणखी कितीवेळा राजकीय पर्यटन करणार आहेत?, असा सवाल पक्ष कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच यंदाही राजकीय बळी ठरणारा उमेदवार देणार असाल, तर राष्ट्रवादीच्या मागे कशाला उभे राहायचे? अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीला आता अवघे दीड महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? हे अजून निश्चित होत नाही. गेल्या तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने या मतदारसंघात बळीचा बकरा बनणारा उमेदवार देऊन शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचे उघड गुपित आहे. आढळराव पाटील यांना सलग तीनवेळा खासदार करण्यामागे राष्ट्रवादीचाच मोठा हातभार लागल्याचे स्पष्ट आहे. तीनही वेळा आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार न देता केवळ “इलेक्शन-इलेक्शन” खेळण्याचे काम केले.

हे आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हळू हळू समजू लागले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये कितीही आरोप-प्रत्यारोप झाले तरी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षात नुरा कुस्ती ठरलेली असते, असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्का समज झाला आहे. आताही तीच राजकीय परिस्थिती दिसून येत आहे. निवडणुकीला अवघे दीड महिने शिल्लक असूनही शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरलेला नाही. दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात पॉवरफुल घराणे आणि राष्ट्रवादीचे पालक असलेल्या पवार कुटुंबातील सर्वांनी गेल्या एक-दोन महिन्यात शिरूर मतदारसंघात हजेरी लावली आहे. आधी खासदार सुप्रिया सुळे, नंतर जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार त्यानंतर आमदार अजितदादा पवार यांनी शिरूर मतदारसंघात कार्यक्रमाच्या निमित्ताने सभा घेतल्या. आता स्वतः शरद पवार साहेब बुधवारी शिरूर मतदारसंघात येणार आहेत.

त्यांच्या हस्ते शिरूरमधील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे बुधवारी उद्घाटन होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात पवार साहेब राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, संपूर्ण पवार कुटुंब शिरूर मतदारसंघात आणखी कितीवेळा राजकीय पर्यटन करणार आहेत?, असा सवाल पक्ष कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच यंदाही राजकीय बळी ठरणारा उमेदवार देणार असाल, तर राष्ट्रवादीच्या मागे कशाला उभे राहायचे? अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना लक्षात घेता पवार साहेब यंदा खरोखरच जिंकण्याच्याच इराद्याने शिरूरमध्ये पक्षाचा उमेदवार उतरवणार की गेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच यंदाही शिवसेनेसोबत “इलेक्शन-इलेक्शन”चा खेळ खेळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार दिलीप वळसे-पाटील, प्रदीप कंद, चंदन सोंडेकर, मंगलदास बांदल यांची नावे चर्चेत आहेत. यातील दिलीप वळसे-पाटील, प्रदीप कंद, मंगलदास बांदल हे कसलेले राजकारणी आहेत. परंतु, या तिघांनीही लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारी सुरू केल्याचे चित्र कोठेही नाही. तिघेही केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित नेते राहिले आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे नवखे कार्यकर्ते चंदन सोंडेकर यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून चंदन सोंडकर यांनी घराघरात पोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा कोणीतरी इच्छुक लोकसभेसाठी तयारी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निवडणूक तोंडावर येऊनही दिग्गज नेते अजूनही घरात बसलेले असताना त्यांच्या तुलनेत चंदन सोंडेकर यांनी गाठीभेटींच्या माध्यमातून मतदारसंघात राष्ट्रवादीचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे शरद पवार शिरूरमध्ये या नवख्या कार्यकर्त्याला ताकद देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.