पेट्रोल पंपावर मोदींच्या फोटोसोबत पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर आहेत’ असे फलक लावा – शिवसेना   

0
684

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्याची सक्ती करण्यापेक्षा पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर आहेत’ असे फलक लावा,  किंवा मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल–डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा, असा उपरोधिक सल्ला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे. 

देशभरातील पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावण्याची सक्ती होत असल्याचा आरोप होत आहे. या ‘फोटोसेशन’पेक्षा पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर आहेत’ असे फलक लागतील हे पहा अन्यथा मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल–डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा, असे अग्रलेखात म्हटले आहे. जनतेचा प्रधानसेवक म्हणवून घेणाऱ्यांच्या राज्यात निदान उरलेले काही महिने का होईना पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर ठेवणे, जनतेला जगण्याचे स्थैर्य देणे का शक्य नसावे? असा सवाल  या अग्रलेखात केला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा पुन्हा ‘विक्रमी’ भडका उडाला आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८५ रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेलदेखील ७३ रुपये प्रतिलिटरवर गेले आहे. म्हणजे भाववाढ कमी करणे तर सोडाच, पण ती रोखणेदेखील सरकारला जमलेले नाही. काही महिन्यांपूर्वी पेट्रोल असेच ८५ रुपये प्रतिलिटर एवढे महागले होते. नंतर ते काही पैशांनी स्वस्त झाले. मात्र हा ‘आनंद’देखील सामान्य जनतेला फार दिवस मिळू नये, असाच सरकारचा कारभार आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.