पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न का भंगले..

0
721

पुणे, दि. ५ (पीसीबी) – पुणे शहरासाठी भव्य दिव्य असे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्याचे पुणेकरांचे स्वप्न भंगले आहे. गेली अनेक दशकांपासून सुरू असलेले प्रयत्न आता संपल्यात जमा आहे. कारण पुरंदर परिसरात जिथे हे नियोजित विमानतळ होणार होते त्याला संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर चे अध्यक्ष सुधीर मेहता यांच्या म्हणण्यानुसार, पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने साइट मंजुरी रद्द केली आहे. “असे दिसते की पुरंदरमधील नवीन ठिकाणी प्रस्तावित पुणे विमानतळाची साइट क्लिअरन्स रद्द केली गेली आहे. याचाच अर्थ हा प्रकल्प आता संपल्यात जमा आहे. पुणे येथे नवीन विमानतळाच्या योजनेबद्दल राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याची विनंती करणार असल्याचे ट्विट मेहता यांनी केले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील आयटी, बीटी, वाहन उद्योग आणि एकूण विदेशी गुंतवणूक पाहता आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियोजन कऱण्यात आले होते. त्यासाठी सुरवातीला चाकण येथे एमआयडीसी हद्दीत ८० हेक्टर जागा निश्चित केली होती. विमानतळ प्राधिकऱणाने ती जागा योग्य नसल्याचे प्रमाणपत्र दिल्याने तो प्रकल्प बारगळला. नंतर कल्याणी फोर्ज कंपनी जवळील वाफगाव पंचक्रोशितील जागा निश्चित केली होती, पण तिथेही नकार आला. तिसऱ्यांदा राजगुरूनगर, दोंदे परिसरातील जागेची पाहणी केली, पण तीसुध्दा पसंत पडली नाही. अखेर गेले दहा वर्षांपासून पुरंदर तालुक्यातील दोन हजार हेक्टर पठार विमानतळासाठी ठरले होते. शेतकऱ्यांना भरपाई देण्यापासून सर्व ठरले होते. आता त्यालाही खो मिळाल्याने विमानतळाचे स्वप्न भंगले आहे.

तथापि, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्यासह पुण्यातील अधिका-यांनी पुणेकर न्यूज.इनला सांगितले की, त्यांना अद्याप अशा कोणत्याही निर्णयाची माहिती नाही. विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याशी त्यांच्या वक्तव्यासाठी संपर्क होऊ शकला नाही.