पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता

0
411

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे. थंडी सुरू असतानाचं पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. रब्बी हंगामाचं पीक काढणीवर आलेलं आहे. त्यातच राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर पुढील दोन दिवस 29 आणि 30 नोव्हेंबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, ठाणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ‘राज्यात 29, 30 नोव्हेंबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाची आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे’, असं मुंबईतील हवामान खात्याचे उपमहासंचालकांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. यासोबतच कोकणात ढगाळ हवामान तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मागील पंधरा दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने आंब्याच्या हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच पुन्हा पाऊस झाल्यास आंबा उत्पादकांना फवारणीचा खर्च वाढणार आहे. तसेच राज्यभरात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊसाची तोड सुरू आहे. आता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी या तोडीमध्ये गती आलेली आहे. पावसामुळे ऊसाची तोड लवकर उरकण्यासाठी शेतकरी प्रयत्न करता आहेत.

दरम्यान, राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत थंडी असेल परंतु, 1,2 आणि 3 डिसेंबर राज्यात वातावरण बदल झालेला दिसून येईल. तीन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे. पाऊस सर्वदूर नसेल पण पाऊस येणार आहे, असं हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितलं आहे. राज्यात 4 डिसेंबर पासून पुन्हा थंडी सुरू होईल धुई, धुके येणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांंनी केलं आहे.