पुण्यात ९ जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेची फाशीची शिक्षा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा 

0
1414

पुणे, दि. ९ (पीसीबी) – पुण्याच्या स्वारगेट डेपोची एक बस पळवून तिच्याखाली चिरडून ९ निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या  एसटी चालक संतोष मारुती माने याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने संतोष मानेला दिलासा देताना आज (बुधवार ) त्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे रुपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत करण्यात आली आहे.

संतोष माने हा मुळचा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवथळे गावचा आहे. ड्रायव्हर म्हणून १३ वर्षांची सेवा झालेला संतोष स्वारगेट डेपोत नियुक्तीवर होता. २५ जानेवारी २०१२ रोजी त्याने स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेतली होती. भर रस्त्यात बेफाम बस चालवून त्याने ९ जणांना चिरडले होते, तर ३७ जण जखमी झाले होते.

शिवाजीनगर न्यायालयाने ८ एप्रिल २०१३ रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावली होती.  त्यानंतर आपल्याकडून हे कृत्य वेडाच्या भरात घडले होते. त्यामुळे भादंवि कलम ८४ अन्वये हे गुन्हे माफ करण्याची विनंती माने याने आधी पुण्याच्या सत्र न्यायालयात व नंतर मुंबई उच्च न्यायालयात केली होती.  माने याने  मानसोपचार तज्ज्ञांचे दोन अहवाल सादर केले होते. ते पाहून सत्र न्यायालयाने मानेचा वेडाचा बचाव अमान्य केला.  उच्च न्यायालयानेही तेच मत नोंदविले होते. आणि फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर मानेने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.