अनधिकृत बांधकामांच्या शास्तीकर माफीची क्षेत्र मर्यादा वाढणार; मुख्यमंत्र्यांचे १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन

0
2688

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – भाजप सरकारने सहाशे चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यापुढील क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांच्या शास्तीकराबाबतही दिलासादायक निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १५ दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शास्तीकरांबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मंगळवारी (दि. ९) चिंचवडमध्ये दिले. तसेच पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांना विश्वासात घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिकेच्या विविध विकासकामांचे ई-उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने घेतलेला हा निर्णय एक हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांनाच लागू होत आहे. ६०० चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना शास्तीकर शंभर टक्के माफ, तर एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना ५० टक्के माफ करण्यात आला आहे. परंतु, शास्तीकर माफीची मर्यादा वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठराव करून तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठीही पाठविला आहे. सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून शास्तीकर माफीची मर्यादा वाढवल्यास पिंपरी-चिंचवडमधील शेकडो नागरिकांना दिलासा मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांची ही मागणी पूर्ण करावी, अशी मागणी केली.

तोच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीकराबाबत येत्या १५ दिवसांत आणखी दिलासा देणारा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. परंतु, नवीन अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका आणि अशा बांधकामांचे कोणी समर्थनही करू नका, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला पवना जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावण्यासाठीही भाजप सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच या या प्रकल्पामुळे शहिद झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी आभार मानले.