पुण्यात सैराटची पुनरावृत्ती: नारळ विक्रेत्यासोबत प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीच्या पतीचा केला खून

0
709

पुणे, दि. २४ (पीसीबी) – बहिणीने नारळ विक्रेत्यासोबत प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने आणि त्याच्या काही साथीदारांनी मिळून तिच्या पतीचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना शनिवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास पुण्यातील कॅम्प परिसरात घडली.

सुलतान महंमद हुसेन सय्यद (वय २४, रा. महंमदवाडी रोड, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित अरबाज कुरेशी व त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुलतान सय्यद हा पुण्यातील कॅम्प परिसरात नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. सुलतान याने १ वर्षापूर्वी अरबाज याच्या बहिणीसोबत प्रेम प्रकरणातून निकाह केला होता. मात्र मुलीच्या घरच्यांना हा निकाह मान्य नसल्यामुळे त्यांच्यात अनेकवेळा वाद झाले होते. शनिवारी रात्री साडेसात सुमारास अरबाज शेख आणि त्याचे साथीदार सुलतान सय्यद नारळपाणी विक्री करत असलेल्या ठिकाणी आले. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी सुलतानला बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले आणि पळ काढला. जवळच्या नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुलतानला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. लष्कर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.