पुण्यात सीएनजी गॅसच्या गळतीमुळे रिक्षा जळून खाक

0
468

पुणे, दि. २ (पीसीबी) – सीएनजी गॅसच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाला आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पुण्यातील लुल्लानगर चौकात घडली. सुदैवाने या आगीत कुठलिही जीवीत हानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास नासीर बागवान (वय ४०) हे  त्याच्या ताब्यातील रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरुन बिबवेवाडीकडून कोंढव्याकडे जात होता. लुल्लानगर येथील चौकातील सिग्नलला जवळ त्यानी रिक्षा थांबवली होती. त्यावेळी रिक्षातून अचानक धूर येऊ लागला आणि रिक्षाने काही सेकंदात पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच नासीर तातडीने  रिक्षाच्या बाहेर पडले आणि अग्निशमन दलाला कळवले. घटनेची माहिती मिळताच कोंढवा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही मिनिटात आग विझवली. या आगीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात वेगवेगळ्या अफवा पसरल्या आणि भितीचे वातावरण निर्माण झाले होते.