पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार

0
124

– पुणे शहर परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गडकरींचा मेगा प्लॅन

पुणे, दि. २ (पीसीबी) : पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न चालू असून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकात भेट दिली यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आणि पुण्याशी जोडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. त्याचबरोबर या रस्त्याच्या कामासंदर्भात महामार्ग आणि मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठकही त्यांनी घेतली. पुण्यातील रस्ते सुसज्ज होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन गडकरींनी सांगितला आहे.

पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत येथील पूल पाडण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच वेळेत काम झाल्यास नव्या पुलाचे उद्घाटन लवकर केले जाईल असं ते म्हणाले. त्याचबरोबर पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार चालू असल्याचं त्यांनी सांगितलं.

याबरोबर पुणे ते शिरूर आणि नगर, औरंगाबाद या जुन्या रोडवर तीन मजली रस्ताच्या डिझाईनचं काम चालू आहे. त्याचबरोबर तळेगाव ते शिरूर हा मार्ग करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारे वाहने वळवता येतील असंही ते म्हणाले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचं काम सुरू आहे. असं गडकरी म्हणाले आहेत.

नाशिक फाटा येथे सुद्धा सहा पदरी दोन मजली उड्डाणपूल आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली रस्ता करण्यासाठी विचार चालू असल्याचं गडकरी म्हणाले. पुणे विभागातील जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी प्रशासनाने आणि मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी असं ते म्हणाले आहेत. पुणे विभागात NHAIच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क करण्यासाठी मनपाने जागा दिली तर दोन लाख कोटी रूपये निधी खर्च करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर चाकण पासून 27 किमीवर असलेल्या पावले वाडी येथे मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी MIDC सोबत 180 हेक्टर जमीनीचा करार झाला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

गडकरींनी सांगितला पुण्यासाठी मेगा प्लॅन
– बावधान ते सातारा रस्त्याचं रूंदीकरण होणार
– कोथरूड-वारजे ते सातारा रस्त्याचं रूंदीकरण
– चांदणी चौकातील पूल येत्या दोन तीन दिवसांत पाडणार
– पूल पाडल्यानंतर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नियोजन