पुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड

0
629

पुणे, दि. २२ (पीसीबी) – पुण्यात पुन्हा एकदा टोळक्यांनी तब्बल १६ वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवली आहे. या तोडफोडीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार रविवारी (दि. २१) रात्री अडीजच्या सुमारास पुण्यातील कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत घडला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी टिकाव आणि कुदळीने घाव घालून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाडया फोडल्या. हल्लेखोरांनी प्रामुख्याने चार चाकी वाहनांना लक्ष्य केले. या तोडफोडीत १२ चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. अचानक गाडयांच्या काचा फुटण्याचे आवाज येऊ लागल्याने काही जणांना जाग आली. पण भितीपोटी कोणी घराबाहेर पडले नाही.

परिसरातील स्थानिक तरुणांनीच या गाडया फोडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र, तोडफोडीमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास करत आहेत.