पुणे शहरात आता कोरोनाचे उपचार घरीच

0
437

पुणे, दि. ११ (पीसीबी) : पुणे, पिंपरी चिचवड शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांवर रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली.  कोरोना बाधित रुग्णांची संभाव्य वाढ लक्षात घेता सर्वांवर उपचार करण्यासाठी जागेसह यंत्रणेचा प्रश्न असल्याने हा नवीन तोडगा समोर आला आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलग करुन त्यांच्या उपचाराची व्यवस्था उभारली जाणार आहे. या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर फोनवरुन सल्ला देणार आहे.
कोरोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना ही सुविधा मिळणार आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांचे घर मोठे आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र किचन, बेडरुम, बाथरुम आणि केअर टेकर आहेत, या रुग्णांवरच घरी उपचार करण्यात येतील, अशा अटी पालिकेने ठेवल्या आहेत. झोपडपट्ट्या किंवा वस्त्यांवरील रुग्णांना हॉस्पिटलमध्येच उपचार दिले जाणार आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आणि अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी पालिका प्रशासनाने हा उपाय सुचवला आहे, असे पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात काल (10 जून) दिवसभरात 435 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 394 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 449 जण कोरोनाबळी गेले आहेत. दुसरीकडे पुण्यात दिवसभरात 304 नवीन बाधित रुग्णांचा वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या पुण्यातील बाधितांचा आकडा 8 हजार 509 वर पोहोचला आहे. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ही 406 वर पोहोचली आहे.