पालखी प्रस्थानसाठी फक्त ५० लोकांची उपस्थिती, – संत तुकाराम महाराज पालखीचे शुक्रवारी प्रस्थान

0
768

पुणे, दि. ११ (पीसीबी) – श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळयास श्री क्षेत्र देहू येथुन 12 जून व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळयास श्री क्षेत्र आळंदी येथून 13 जून रोजी, मंदीर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीस उपरोक्त निर्देशांचे पालन करुन परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या अनुषंगाने श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहु, ता. हवेली, जि. पुणे व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी, ता.खेड जि.पुणे येथुन पंढरपुरला जाण्यासाठी प्रस्थान करीत असतात. तरी, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू येथुन 12 जून व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथुन 13 जून रोजीच्या प्रस्थान सोहळयास या दोन दिवसांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

पुणे जिल्हयातील श्री क्षेत्र देहू व आळंदी यांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे नियमावलीचे पालन करुन तसेच पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करुन, दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थान मंदीर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आदेशान्वये कळविले आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन दरवर्षीचा आषाढी पालखीचा पायी पालखी सोहळा रद्द कऱण्यात आला. सुमारे पाच ते सात लाख वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात आणि वीस दिवस हा सोहळा चालतो. पुणे व पिंपरी चिंचवड शहर, शेजारील सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पायी सोहळा रद्द कऱण यात आला आहे. आता थेट एकादशीलाच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपुरात नेण्यात येणार आहेत.