निर्णय प्रक्रीयेत घेतले जात नसल्याने काँग्रेसची नाराज

0
240

मुंबई, दि.११ (पीसीबी) : महाविकास आघाडीतील तीन पक्षांमधील कुरबुऱ्या सुरुच असल्याचे चित्र आहे. निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नसल्याने काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसने आज स्वतंत्र बैठक घेऊन त्याबाबत चर्चा केली. मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे कोरोनावर मात करुन आलेले अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच या बैठकीला हजेरी लावली.

काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही. निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना या बैठकीबाबतची माहिती दिली. थोरात म्हणाले “राज्याचे काही प्रश्न घेऊन आम्ही एकत्र बसलो होतो. चक्रीवादळ झालं, त्या पाहणीसाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही ते मांडणार आहोत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्या काही मागण्या आहेत. साहजिकच काही प्रश्न आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील करणयाचा प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत”

महाविकास आघाडीचेही काही प्रश्न आहेत, त्यावर चर्चा झाली. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं थोरात यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा घटकपक्ष आहे. आम्ही 12 मंत्री आहोत. राज्याचे काही विषय घेऊन चर्चा झाली. कोरोना संकट, वादळ आहे. पालकमंत्री, संपर्कमंत्री यांची चर्चा झाली. सरकार म्हणून आमची चर्चा झाली, असं थोरात म्हणाले.

आम्ही ज्यावेळी एकत्र बसतो, त्यावेळी आमच्या चर्चा होतात. आमच्या अपेक्षा साहजिकच सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांकडून आहेत. त्याबाबतही चर्चा झाली. आम्ही घटकपक्ष आहोत. सरकार तीन पक्षांचं आहे. एकट्या पक्षाच्याही चर्चा होतात. आमच्या मागण्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक मागण्या नाहीत, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

सरकारने महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घ्यायला हवं. राज्यपाल नियुक्त १२ सदस्य विधान परिषदेवर जाणार असून त्यात काँग्रेसला अधिकच्या जागा दिल्या जाव्या. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्याबाबत काँग्रेसचे मत जाणून घ्यावे, अशा काही मागण्या काँग्रेसजांच्या आहेत.