पुणे रेल्वे सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट

0
283

पुणे, दि. 30 (पीसीबी) : पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची आज एकमताने निवड करण्यात आली. 

आज पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची व्हर्चुअल बैठक झाली. त्यामध्ये पुणे – नाशिक रेल्वेमार्ग, पुणे -लोणंद रेल्वेमार्गाचे भूसंपादन व त्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. खासदार महोदयांनी त्यांच्या भागातील रेल्वेचे प्रश्न मांडले. या बैठकीमध्ये खासदार बापट यांची पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. 

खासदार बापट संसदेच्या अंदाज समितीचेही अध्यक्ष आहेत. त्यांना पुणे मेट्रो आणि हिंजवडी मेट्रोच्या उभारणीच्या कामाचाही अनुभव असल्याने पुणे विभागातील रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्याकडे ते यशस्वी पाठपुरावा करतील याबद्दल पूर्ण खात्री आहे. 

या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीनिवास पाटील, डॉ.अमोल कोल्हे व रेल्वेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.