पुणे जिल्ह्यात मतदार संख्या ८२.९२ लाख

0
53

पुणे, दि. १० (पीसीबी)- पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघ मिळून मतदारांची एकूण संख्या ८२ लाख ९२ हजार ९५१ पर्यंत पोहोचली.लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ही माहिती दिली. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.

अंतिम मतदारयादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली. त्यानंतर नावनोंदणीसाठी नव्याने आलेल्या अर्जांवर तसेच इतर राज्यांतून पुण्यात स्थायिक झालेल्या मतदारांच्या अर्जांवर मागील सुमारे अडीच महिन्यांत कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे एक लाख ६५ हजार ९३२ इतक्या मतदारांची संख्या वाढली.

डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘अंतिम मतदारयादीत मतदारांची एकूण संख्या ८१ लाख २७ हजार १९ इतकी होती. जिल्हा प्रशासनाने मोहीम राबविल्यामुळे नवमतदारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली. आणखी २३ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे.’’

मतदारयादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया निरंतर सुरु असते, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, ‘‘उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदारयादीत नाव नोंदविता येते.

त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघासाठी नाव नोंदविण्याची शेवटची तारीख मंगळवारपर्यंत (ता. ९) पर्यंत आहे. पुणे , मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांसाठी १५ एप्रिलपर्यंत नाव नोंदविता येईल. या कालावधीत येणाऱ्या अर्जांवर कार्यवाही करून पुरवणी मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.’’

मतदारांची संख्या वाढल्याने मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत एकूण ८ हजार ३८२ मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. येत्या एक-दोन दिवसांत प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा मतदारसंघनिहाय मतदार

पुणे ः २० लाख ४७ हजार ३८९
बारामती ः २३ लाख २६ हजार ४८७
शिरूर ः २५ लाख२७ हजार २४१
मावळ ः १३ लाख ५५ हजार ९१४