‘पीसीएनटीडीए’, ‘पीएमआरडीए’मधील सदनिकांवरील मुद्रांक शुल्कात कपात करा!

0
271

– उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे निवेदन

पिंपरी, दि.०९(पीसीबी) : “कोरोना विषाणु आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे महानगर विकास प्राधिकरण, औद्योगिक विकास महामंडळ आदी क्षेत्रातील सदनिका, मिळकतींवरील मुद्रांक शुल्कात कपात करावी”, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास २५ लाखांच्या घरात आहे. शहरात कामगार व मध्यमवर्गीय लोकसंख्या जास्त आहे. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असून दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे.”

दरम्यान, राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मुद्रांक शुल्कांत सवलत देवून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता हातभार लावला आहे. सदरची मुद्रांक शुल्क सवलत प्राधिकरण, एमआयडीसी, सिडको, हडको इत्यादीमार्फत बांधलेल्या सदनिका खरेदी करण्याकरिता लागू केल्यास त्याचा फायदा बहुसंख्यांना होईल, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून सुमारे २७ रजिस्टर कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयात मिळून दरदिवशी सुमारे आठशेहून अधिक दस्त होतात. तर वर्षभरात सुमारे २८ ते ३० हजार दस्त नोंदवले जातात. कोरोनामुळे सध्या दस्तनोंदणी कमी होत असली, तर मुद्रांक शुल्कात अथवा रेडी-रेकनरच्या दरात सवलत मिळाल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.