पिंपळे सौदागर येथील बेपत्ता झालेल्या अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

0
726

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील लेबर कँप येथील वस्तीतून बेपत्ता झालेल्या अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना  घडली आहे.  याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.  त्यांची कसून चौकशी  केली जात  आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ही मुलगी सोमवारी  मध्यरात्रीपासून बेपत्ता होती.  पहाटे तीन वाजेपर्यंत या मुलीचा तिच्या आई वडिलांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही,  त्यानंतर  सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी दिली.

पोलिसांनी या मुलीचा शोध  सुरू केला असता  मिलिट्री कॅम्पच्या  कंपाऊंडच्या आत पाण्याच्या खड्ड्यात या मुलीचा मृतदेह पहाटेच्या सुमारास सापडला.  तिचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.     मुलीचा मृतदेह औंध रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी  लैंगिक अत्याचाराचा संशय व्यक्त केला आहे.