पिंपळे गुरव येथे सासू घरी बसण्यास येत असल्याच्या रागातून एकाच्या डोक्यात घातला पाट

0
570

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – सासू घरी बसण्यास येत असल्याच्या रागातून चार जणांनी मिळून एकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात लाकडी पाट मारुन जखमी केले. ही घटना रविवारी (दि.३१) रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर गल्ली नं.३ येथील गितांजली अपार्टमेंट फ्लॅट नं.१०३ मध्ये घडली.

प्रवीण रमेश चाफेकर (वय ३२, रा. गितांजली अपार्टमेंट, फ्लॅट नं.१०३, लक्ष्मीनगर गल्ली नं.३, पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोवींद कळशे, बालाजी गणपतराव हाळीकर, विठ्ठल हाळीकर आणि माधव दापकेकर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी प्रवीण यांच्या घरी त्यांची सासू वारंवार बसण्यास येत असल्याच्या रागातून चौघा आरोपींनी प्रवीण याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात लाकडी पाट मारुन जखमी केले. याप्रकरणी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी तपास करत आहेत.