पिंपळेसौदागर-रहाटणी परिसरासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर – नगरसेवक शत्रुघ्न काटे

0
1249

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार पिंपळेसौदागर-रहाटणी परिसरात स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात यश आले आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना नगरसेवक काटे म्हणाले, “माझ्या प्रयत्नातून पिंपळेसौदागर येथे स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे सादरीकरण हॉटेल गोविंद गार्डन येथे करण्यात आले होते. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्मार्ट सिटी काय आहे?, ती कशी असणार आहे?, याचे तब्बल दीड तास संगणकीय सादरीकरण केले होते. तसेच स्मार्ट सिटी संदर्भात नागरिकांशीही संवाद साधला होता.

छत्रपती शिवाजी महाराज लिनीअर अर्बन गार्डन, पेडल सायकल, वाहतुकीला आळा घालण्यासाठी भुयारी मार्ग, उड्डाणपूल, रहाटणी सौदागर येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी कै. बाळासाहेब कुंजीर प्ले-ग्राऊंड येथे ओपन जिम उभारण्यात आली आहे. तसेच फुटबॉल ग्राऊंड, टेनिस कोर्ट, स्केटिंग ग्राऊंडचा आराखडा तयार करून लवकरच या कामांना सुरु करण्यात येणार आहे. कुणाल आयकॉन रोड येथील दोन लाख स्केअरमध्ये उभारण्यात आलेले राजमाता जिजाऊ उद्यान, हॉकर्स झोन, रहाटणी सौदागरच्या पिण्याच्या पाणी सारखा गंभीर प्रश्न मार्गी लावुन ८० लाख लिटर पिण्याच्या पाणीच्या टाकीचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करुन तोही प्रश्न मार्गी लावण्यात आले आहे. प्रथमच चालु करण्यात येणारे इ-स्कूटर सेवा, पार्किंग झोन पीवन आणि पी टू, सौदागर येथील शंकर मंदिरासमोरील मोकळ्या जागेत बस डेपो आणि ऍडीटोरियम हॉल, सिनिअर सिटीजनसाठी विरंगुळा केंद्र, काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली तेजस्विनी बस सेवा असे बरेच स्मार्ट प्रोजेक्ट आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मी स्वतः व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आहेत.