चिंचवडमध्ये लीफ्टच्या बहाण्याने दुचाकी पळवली

0
455

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – लीफ्ट घेण्याच्या बहाण्याने दोघेजण दुचाकीवर बसले त्यानंतर दुचाकीस्वाराला धमकावत त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन पसार झाले. ही घटना रविवारी (दि. २४) कैलास डेअरी जवळ मोहननगर येथे घडली.

याप्रकरणी गणेश गोवार्दन घोडेस्वार (वय २७, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना वापरण्यासाठी कंपनीने दुचाकी (क्र.एमएच/०३/सीझेड/५६९०) दिली होती. ती दुचाकी घेऊन रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ते मोहननगर मधील कैलास डेअरी येथून जात होते. त्यावेळी अज्ञात दोन आरोपींनी त्यांना लिफ्ट मागितली. गणेश यांनी लिफ्ट दिली असता आरोपींनी त्यांना धमकी देऊन दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.