पिंपळेनिलखमधील साई चौकातील उड्डाणपुलाच्या एका लेनचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

0
870

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – सांगवी ते किवळे बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाची एक लेन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. ३१) वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. पिंपळेनिलख आणि पिंपळेसौदागर परिसरातील रस्त्यांवर तसेच सांगवी ते किवळे बीआरटी रस्ता आणि साई चौकात होणारी वाहतूककोंडी या उड्डाणपुलामुळे सुटण्यास मदत होईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, भाजपचे स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका आरती चोंधे, निर्मला कुटे, राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक नाना काटे, नगरसेविकी शीतल काटे, पिंपरी-चिंचवड महापालिका व प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “रहाटणी, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर या भागात राहणारे कर्मचारी व नागरिक सांगवी ते किंवळे या बीआरटीएस मार्गावरील जगताप डेअरी, साई चौकातून हिंजवडीच्या दिशेने जातात. या चौकात चारही बाजूने रस्ते येत असल्यामुळे तेथे प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यावर कायमची मात करण्यासाठी साई चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. प्राधिकरणाने या चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले. या उड्डाणपुलाच्या एक लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तो वाहतुकीसाठी तातडीने खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे सांगवी ते किवळे बीआरटीएस मार्गावरील तसेच पिंपळेसौदागर ते वाकड रस्त्यावरील वाहतूककोंडीही कायमची दूर होण्यात मदत होईल. साई चौकात उड्डाणपुलासोबत ग्रेड सेपरेटरही उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.”