चाकणमध्ये पान न दिल्याने टपरी चालकाच्या डोक्यात फोडली काचेची बरणी

0
888

चाकण, दि. ३१ (पीसीबी) – पान न दिल्याच्या रागातून एकाने पान टपरी चालकाच्या डोक्यात काचेची बरणी फोडून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चाकण खालुंब्रे येथील पान टपरीवर घडली.

आशुतोष रमेश चौव्हाण (वय १८, रा. खालुंब्रे सिध्दीविनायक हॉस्पिटलजवळ, चाकण) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निखील (पूर्ण नाव पत्ता समजू शकलेला नाही) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आशुतोष याच्या काकाची खालुंब्रे येथे पानाची टपरी आहे. शनिवारी रात्री तो टपरीवर असता आरोपी निखील तिथे आला. त्याने आशुतोषला पान मागीतले. मात्र आशुतोष याने निखील याला पहिले पैसे दे मग पान देतो, असे बोलला. यामुळे चिडलेल्या निखीलने पानटपरीतील काचेची बरणी आशुतोषच्या डोक्यात फोडली. यामध्ये आशुतोष गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडला. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी निखीलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.