पिंपरी महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या वेतनातून ठेकेदार लुटतात महिन्याला तब्बल ८० लाख रुपये

0
757

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ ठेवणाऱ्या एक हजार ६०० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ठेकेदार दरमहा ८० लाखांची लूट करत आहेत. त्यासाठी या गोरगरीब कर्मचाऱ्यांचे बँक पासबूक, डेबीट कार्ड ठेकेदारांनी काढून घेतले आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व कामगार नेते यशवंत भोसले यांनी शनिवारी (दि. २) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी योगेश जगदाळे, जोसेफ गायकवाड, दिनेश पाटील, दीपक पाटील, संतोष टाकळे आदी उपस्थित होते.

यशवंत भोसले म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. महापालिकेचे कर्तव्य पूर्ण करण्याचे काम कंत्राटी सफाई कर्मचारी करत असताना त्यांच्या पैशांची लूट होणे दुर्दंवी आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून महापालिका साफसफाईची कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करुन घेत आहे. सात ठेकेदारामार्फत ते काम करुन घेतले जात आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणारे एक हजार ६०० कर्मचारी आहेत. महापालिका त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे महिन्याला १३ हजार रुपये वेतन देत आहे. परंतु, संबंधित ठेकेदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून लूट करत आहेत.

सफाई कर्मचाऱ्यांच्या नावे बँकेत खाते आहे. डेबिट कार्ड आहे. परंतु, ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांकडून डेबीट कार्ड, पासबूक काढून घेतले आहे. ठेकेदार दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतात. त्यांच्या हातात केवळ आठ हजार रुपये टेकवले जात आहे. त्यांना दमबाजी करुन १३ हजार रुपये दिल्याच्या खोट्या सह्या घेतल्या जात आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याने १३ हजार रुपये मागितल्यास त्याला कामावरुन काढून टाकले जाते. एका कर्मचाऱ्यामागे पाच हजार असे महिन्याला तब्बल ८० लाख रुपयांची लूट ठेकेदारांकडून केली जात आहे. तसेच दोन-दोन महिने वेतन दिले जात नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या पैशांची ठेकेदारांकडून लूट होत असल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारीही मान्य करत आहेत. बँकेचे पासबुक आणि डेबीट कार्ड चोरीला गेल्याबाबत कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असता. बँकेतील खाते ठेकेदारांकडून बंद केले जात आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुढाकार घेऊन सफाई कर्मचाऱ्यांची होणारी लूट थांबवावी. त्यांना १३ हजार रुपये मूळ वेतन मिळावे. महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या नावे त्यांच्या खात्यावर थेट वेतन जमा करावे. त्यामुळे भ्रष्टाचार थांबेल. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करुन येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भोसले यांनी दिला.