५ लाखांची लाच घेताना बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक

0
885

बीड, दि. २ (पीसीबी) – पाच लाखांची लाच स्वीकारताना बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक महादेव महाकुंडे यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

आज (शनिवार) सकाळी कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानी लाचलुचपत विभागाने सापळा रचून ५ लाख रुपये स्वीकारताना कांबळे आणि लिपीक महादेव महाकुंडे यांना  रंगेहात पकडले. त्यानंतर  कांबळे यांच्या बीडसह औरंगाबाद, नांदेड, तळेगाव येथील घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले.

पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी कांबळे यांनी ५ लाखांची मागणी केली होती. एका गोदाम रक्षकावर झालेल्या आरोपांची चौकशी कांबळे यांच्याकडे होती. या चौकशीत मूळ अभिलेखा तपासला जाणार होता. त्या गोदाम रक्षकाला क्लिनचीट देण्यासाठी कांबळे यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली होती.