लोकसभेच्या सर्व जागा लढवण्याचे वंचित बहुजन आघाडीचे नियोजन – अशोक सोनोने

0
919

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – सत्ता संपादन करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार पक्का असून लोकसभा निवडणूकीत राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे नियोजन झाले आहे, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी शनिवारी (दि. २) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला शहराध्यक्षा लता रोकडे, अनिल जाधव, डॉ. संजय सोनेकर, अरुण चाबुकस्वार, शहर प्रवक्ते के. डी. वाघमारे, शहर महासचिव सुहास देशमुख आदी उपस्थित होते.

अशोक सोनोने म्हणाले, “बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ; आता भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची. दिल्ली विधानसभेत ज्याप्रमाणे सत्ता परिवर्तन झाले त्याप्रमाणे आलटून पालटून सत्ता उपभोगणारे भाजप सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना दुर ठेवून वंचित बहुजन आघाडीला सत्ता देण्याचा निर्धार जनतेने केला असल्याचे त्यांनी सांगितले.”

शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले, “सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाला कंटाळून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांची लाट उद्योगनगरी पिंपरी चिंचवडला देखील आल्याचे दिसत आहे. हिंदूस्थान अँन्टीबोयोटिक्स कंपनीतील कामगारांना मागील वीस महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. या आर्थिक विवंचनेतून शुक्रवारी रामदास उकीरडे या कामगाराने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एच. ए. च्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.”