पिंपरी महापालिकेचा लाचखोर लिपीक अमोल वाघेरेच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश

0
523

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीवाघेरे करसंकलन विभागीय कार्यालयातील लाचखोर लिपीक अमोल वाघेरे याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निलंबित केले आहे. तसेच त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अमोल वाघेरे हा महापालिकेच्या पिंपरीवाघेरे करसंकलन विभागीय कार्यालयात लिपीक पदावर कार्यरत होता. त्याने एका नागरिकाला त्याच्या पत्नीच्या नावे सदनिका हस्तांतरित करण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत संबंधित नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ मार्च २०१८ रोजी सापळा रचून वाघेरे याला संबंधित नागरिकाकडून लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडले. तसेच त्याला अटक करून त्याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून कळविले आहे. त्याची दखल घेऊन आणि अमोल वाघेरे याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त हर्डीकर यांनी त्याला सेवा निलंबित केले आहे. तसेच त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.